Wednesday, 25 May 2011

अमरकोश

 आज सकाळीच अविनाश पंडितांनी एक कोडं घातलं - progress of various sectors in these fields याचा अनुवाद कर.  दोन्हीसाठी क्षेत्र हा शब्द वापरला जातो, पण या एका वाक्यात तो दोन्ही अर्थांनी वापरता येत नाही. त्यांनी सुचवले sector साठी क्षेत्र आणि field साठी टापूभौगोलिक क्षेत्रासाठी टापू ठीक आहेपण इथे मला तो अगदी योग्य आहे असे वाटेनामला वाटतं,  sector साठी `विभाग किंवा शाखा ' असं म्हणून field साठी क्षेत्र शब्द ठेवावा. तुम्हाला काय वाटतं ?
पण मंडळी, या कोड्याचं उत्तर शोधताना मला एका फार प्रिय आणि जुन्या मित्राची आठवण झाली, आणि तो भेटलाही - ऑन लाईन - द्वारा UCLA -  अमरसिंह. अं हं - हा, म्हणजे हे साधारण १६०० - १७०० वर्षांपूर्वी होऊन गेले. होय होय, तेच - अमरकोश चे जनक!  `श्रीमदमरसिंहविरचितं नामलिंगानुशासनम' शी तुमची ओळख झाली आहे का? आद्य lexicon.  स्वर्ग , भूमी, पशु, अशी नीट विषयवार आणि मधुर श्लोकबद्ध रचना असलेला अमरकोश म्हणजे शब्द्सुखाचा अमर ठेवा आहे.
ही इतकी जुनी रचना साहजिकच मौखिक परंपरेने जतन केली गेली असणार. नंतर कदाचित हस्तलिखित पोथ्या असतील. पण हे धन छापील स्वरुपात आलं ते १९१३ साली - श्री कृष्णाजी गोविंद ओंक यांच्या प्रयत्नांनीत्यांची प्रस्तावना सुद्धा वाचण्यासारखी आहे. मला तर  ओंक आजोबांच्या सानुनासिक आवाजातली  प्रस्तावना ऐकूसुद्धा आली
या ग्रंथाला क्षीरस्वामींची टीप / टीका आहे.
अवश्य पहा :    
http://www.archive.org/texts/flipbook/flippy.php?id=namalinganusasan00amariala

Saturday, 21 May 2011

अनुवादामाजी

दि. २० मे  २०११ ला अनुवादक  आणि संपादक यांची छान चर्चा  झालीअनुवादित  साहित्यकृतीचा  दर्जा वाढवणे यासाठी काय करता येईल हा मुख्य विषय.  अनुवाद करताना आणि संपादन करताना सर्वांना काही मुद्दे प्रकर्षाने जाणवतात, त्यांवरील  चर्चेतील हे महत्त्वाचे मुद्दे :

१.       इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांतील वाक्यरचना अगदी वेगळी आहे. इंग्रजीतील clauses, sub-clauses मराठीत आणले, तर ती भाषा कृत्रिम वाटते. उदा. i like to visit the place where I have spent my childhood या वाक्याचं मराठी भाषांतर, `मला अशा जागी जायला आवडतेजिथे मी माझं बालपण घालवलं' , असं करण्या ऐवजी `माझं बालपण जिथे गेलंत्या ठिकाणी जायला मला आवडतंअसं केलं, तर मराठी बाज कायम राहतो.  
२.      याच वरच्या उदाहरणात आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे वाक्यांशांचा क्रम. इंग्रजीत main clause आधी, नंतर sub-clause/ s अशी रचना असतेतर मराठीत ती बरोबर उलट असते. अनुवादकांनी लिहिण्याच्या ओघात याचे भान ठेवावे.
३.      वाक्यरचनेबद्दलचा आणखी एक मुद्दा म्हणजे इंग्रजीत लांबलचक वाक्ये,  clauses च्या सहाय्याने सहज लिहिली जातात, पण  इतकी लांब वाक्ये ही मराठीतील नैसर्गिक रचना नाही. विशेषतः माहितीपर पुस्तके अनुवादित करताना, अशा लांबसडक वाक्यांच्या मोहात पडले, तर मूळ आशय सोपेपणाने व्यक्त होत नाहीआशय प्रभावीपणाने पोचवण्यासाठी, जर वाक्ये तोडावी लागत असतील, तर तोडावी. फक्त संपूर्ण पुस्तक एकाच प्रकारे करावे.
४.     अनुवादित लेखन बोली भाषेत ठेवावे, की ग्रांथिक भाषेत? - तर पुस्तकाच्या विषयाला, भाषेला साजेसा निर्णय घ्यावा. अनौपचारिक भाषेत, संवादात्मक स्वरूपात, किंवा गोष्टीरूपाने लिहिलेल्या मूळ इंग्रजी  कृतीचा अनुवाद बोली भाषेत (केलं, वाटलं, त्यातल्या .) करावा, अधिक औपचारिक, तात्विक पुस्तांचा अनुवाद ग्रांथिक भाषेत (केले, वाटले, त्यातील . ) करावा.
५.     किती मराठी, किती इंग्रजी - किती प्रमाणात इंग्रजी शब्द वापरावे हा नेहेमी पडणारा प्रश्न. अनेक उदाहरणं आणि चर्चा झाल्यावर एक सामान्य निष्कर्ष असा निघाला की वस्तुवाचक नामांच्या बाबतीत रुळलेली इंग्रजी नावे( टेबलऑफिस), तंत्रज्ञानाशी निगडीत नामे ( रेल्वेटेलिफोन .) तशीच ठेवावीविशेषणे  क्रियापदे मात्र कटाक्षाने मराठी वापरावी.   
६.      लघुरूपे  इंग्रजी सारखी LBW, UFO, CEO, FYI अशी लघुरूपे मराठीत प्रचलित नाहीत. आता भा-पो (भावना पोचल्या) सारखी नव्याने रूढावायलाही  हरकत नाही. पण तोवर आपल्याला हे दोन तऱ्हेने हाताळता येईल. एक - त्याच वाक्यात त्याचा मराठी प्रतिशब्द, इंग्रजी पूर्ण शब्द आणि कंसात लघुरूप देणे. उदा. मुख्य कार्यकारी अधिकारी, (chief executive officer (CEO))  किंवा दोन - तिथे फक्त सी म्हणावे, प्रकरणाच्या शेवटी टीप द्यावी. अर्थात हे  पुस्तक माहितीपर ,  किंवा self help प्रकारातील असेल तिथे शक्य आहेनाहीतर  कथासंग्रहाला  पाठ्यपुस्तकाची कळा येऊ नये. त्यामुळे हे तारतम्य बाळगावे लागेल. परंतु आपल्याला हे भान ठेवावे लागेल की अनेक लघुरूपे अशी असतात की ती रूढ आहेत, पण त्याचे पूर्ण रूप किंवा अर्थ माहीतच नाही, त्यावेळी 'आशय पोचण्यासाठी जे आवश्यक ते' हे सूत्र ठेवावे, असे वाटते.
७.     अनेक इंग्रजी - विशेषतः अमेरिकन पुस्तकांमध्ये धार्मिक संदर्भ, बायबल, . येतात. त्यांचे काय करावे? आमच्या चर्चेत असे मत पडले की जेव्हा तो अमेरिकन लेखक ' ख्रिस्चन' म्हणतो, तेव्हा त्याला ख्रिस्ती धर्माचा असे म्हणायचे नसून, व्यापक अर्थाने धार्मिक, धर्मश्रद्ध, श्रद्धाळू असे म्हणायचे असते. तसेच बायबल मधल्या संदर्भांशी सर्वसामान्य मराठी तदाकार होऊ शकत नाही, म्हणून  एकतर समानार्थी संतवचन द्यावे (!) किंवा बायबल मधील त्या ओवीचा अर्थ द्यावा
८.      अनेक धार्मिक संदर्भ असे असतात की त्यांचे फक्त शब्दशः भाषांतर होऊ शकते. प्रदक्षिणा, विसर्जन या शब्दांचे भाषांतर होऊ शकते, पण त्याचा धार्मिक संदर्भ पोचला नाही तर त्याचा परिणाम साधणार नाही. त्या ऐवजी offerings to God एवढ म्हटलं, तरी रूढीमागची भावना पोचते.
९.      सांस्कृतिक संदर्भ, जीवन शैलीशी निगडीत संदर्भ यांचेही शब्दशः भाषांतर करताना खरंच कसोटी लागते. श्री. शिरीष सहस्रबुद्धे यांनी मस्त उदाहरण दिलं, ' पु लंनी म्हटल्याप्रमाणे, ‘आमच्या हिच्या हाताच्या कुळथाच्या पिठल्याची सर कश्शाला येणार नाही' या वाक्याचा ' अनुवाद कसा करणार  ?  डेटिंग आपल्याकडे सर्रास नाही. sex , प्रसूती यांची तपशीलवार वर्णने अमेरिकन पुस्तकांत येतातपण त्यांचा अनुवाद करताना आपण मराठी वाचकांच्या संवेदनशीलतेला   धक्का लावत नाही हे भान असावे.
१०.   विशेष नामांचे उच्चारानुसार लेखन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. उज्जवला बर्वे यांनी उदाहरण दिले की रशियन भाषेत हा उच्चारच नाही. मेडवेडेव लिहून चालणार नाही. स्पानिश मध्ये  या व्यंजनाचा    उच्चार  नाही, नाहीत, तर , आहेत. `आस्ता ला विस्ता' नसून `आस्ता  ला बिस्ता' आहे. ही काळजी घ्यावीत्या भाषेतील जाणकार व्यक्तीकडून उच्चार माहित करून घ्यावे   
११.    वाक प्रचार, म्हणी यांचा वापर लक्षात आला पाहिजेअलंकारिक अर्थाने लेखक काही म्हणत असेलतर ते समजून त्याचा अनुवाद करावा, हे सांगायला नको.  
१२.  प्रत्येक भाषेचे म्हणून काही `शब्दालंकार' असतात. त्या भाषेतील यमक, अनुप्रास वाचायला फार गोड वाटते. शाब्दिक कोट्यांनी वाचनाचा आनंद दुणावतो.   ती गम्मत मराठीत आणता आली तर उत्तम! पण प्रत्येक वेळी ते शक्य असते असे नाही, तेव्हा ओढून ताणून असे करून गम्मत घालवू नये. पुन्हा पु लंच उदाहरण द्यायचं,तर त्यांच्या कोट्यांचा   अनुवाद करायला दिमतीला `जीव्हज' चा मालकच हवा.
१३.   काही स्थळाची, कार्यक्रमांची  नावे मूळ इंग्रजी ठेवावी. जंगल बुक्स चे.  वोल (wall ) स्ट्रीट, क्वीन मेरी बोट यांचे भाषांतर करू नये, कारण ती विशेष नामे आहेत.
१४.   या उलट जिथे नाव  बदलल्यामुळे मरठी वाचकाला आपलेपणा वाटेल व विषय पोचेल असे वाटत असेल तिथे माणसांच्या नावांचे सुद्धा भाषांतर करावे, असे वाटते. उदा. Adam faced an interviw and made some avoidable mistakes यात आदमने केलेल्या चुका मराठी अनिलने करू नयेत यासाठी आपण ते पुस्तक मराठीत आणतो आहोत, तर तिथे अनिल म्हटल्याने त्याचे लक्ष टिकून राहील.
१५. आता शेवटचा आणि नाजूक मुद्दा. खास करून अमेरिकन लेखकांची पद्धत - सौम्य शब्दात सांगायचं तर - जास्त विस्तार करून, पुन्हा पुन्हा सांगण्याची असते. मराठी बाण्याप्रमाणे यात पुनरुक्ती वाटू शकते. तर त्या वेळी, अगदी सर्वसामान्य मराठी वाचक डोळ्यासमोर ठेवून त्याला विषय समजेल इतपत विस्तार कायम ठेवावा, पण जिथे अंमळ जास्त पुनरुक्ती (!) वाटते, तिथे अनुवादकाने थोडे स्वातंत्र्य घेऊन संक्षेप करायला हरकत नाही.
 प्रत्येक अनुवादक हा `मनोगत' देतो / ते. त्यात आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल चार शब्द आवर्जून लिहावे. वाचकाला त्यातून काही न पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, व हे बदल जाणीवपूर्वक केले आहेत (हे वाचून अनुवादकाबद्दलाचा आदर द्विगुणीत होईल) व तो अनुवादाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकेल.

वरील सर्व मुद्दे हे आमच्या चर्चेतील विचार आहेत. ते शुद्धलेखनाचे किंवा व्याकरणाचे नियम नाहीत. अनुवादकाने आपल्या आवडीप्रमाणे अनुसरावे. अनेक अनुवाद व संपादन करतानाच्या अनुभवांवरून, अनुवादाची गुणवत्ता वाढावी म्हणून ही केवळ सूत्रे आहेत.