Saturday, 14 May 2011

प्रत्येक भाषा मधुर असते, सुंदर असते. गोष्ट सांगण्या - ऐकण्यासाठी भाषेचा अडसर वाटू नये, उलट ती गोष्ट तितक्याच समर्थपणे इतर भाषकांपर्यंत   पोचावी, म्हणून अनुवाद! केवळ शब्दशः भाषांतर नव्हे, तर, एका भाषेतली गोष्ट, विचार दुसऱ्या भाषेत तितक्याच ताकदीने पोचवणे म्हणजे अनुवाद!

लहानपणी `चौघीजणी', `पाडस', 'दुःखी' यांसारखे सरस अनुवाद वाचले. मेघदूतम चे शांताबाई आणि वसंत बापट दोघांनी केलेले सहज- सुंदर अनुवाद फार समृद्ध करून गेले, तशीच अनुवादातील लवचिकताही कळून आली. मग त्या मूळ साहित्यकृती  वाचण्याची स्वाभाविक ओढ वाटू लागली, मग त्या लेखकांचे आणखी साहित्य, मग त्या भाषेतील आणखी साहित्य, त्यातून त्या त्या संस्कृतींची ओळख असा श्रीमंती प्रवासच सुरु झाला.

मग मलाच अनुवाद करायची संधी मिळाली,  ते अनुवादही वाचकांच्या पसंतीस उतरले.

आता त्यापुढचा टप्पा आला आहे, आणि आता एका कट्ट्याची गरज भासू लागली आहे.
इथे अनुवादकांनी आपले अनुभव इतरांना सांगावे, कुणी शब्दांचा शोध लावला असेल, तर तोही इथे जाहीर करावा. टुकार अनुवादाला भरपूर हसावे, सुधारावे, संपादकांनी सल्ले द्यावे, अगदी शुद्धलेखनाबद्दल वाद घालावे, (किंवा वाद कशाबद्दलही घालावे..), आवडलेले अनुवाद इतरांना सांगावे, कुणाला अनुवाद करून हवे असतील, तर तेही इथे जगजाहीर करावे...... एकूण काय, हा कट्टा सतत राबता ठेवावा.

सुरवातीला  तरी मराठीत, आणि लवकरच इतर भाषांतही !

1 comment:

  1. Tumachi charcha ani tyatlya anek goshti khup interesting ahet. yacha upyog khup janana hoil asa mala vatata.Hya saglya goshti Anuwadakana khup faydeshir thartil asa maza vaiyaktik mat ahe. khup chan vatala sagala vachun. Tumhala saglyanach mazyatarfe khup khup Shubhechcha.

    ReplyDelete